Search Engine Optimization

Thursday, December 26, 2019

चुक आपली होती

*चुक आपली होती...*

"ऐक ना...मला एका नोकरीचा कॉल आला आहे...चांगली कंपनी आहे..करू का जॉईन?"

अनुराधा च्या या वाक्याने गिरीश च्या चेहऱ्यावरचे भावच बदलले...

"हे बघ...स्रीस्वातंत्र्य, स्त्रीचं आर्थिक स्वातंत्र्य सगळं मान्य आहे मला...पण... नको करू नोकरी...प्लिज..."

"अरे पण का? नेमकं कारण काय?"

"माझी आई आज आपल्यात नाही...तीही शिक्षिका होती..नोकरी करायची...पण ती नोकरीला जात असल्याने आमचे खूप हाल झालेले गं... मला त्याची पुनरावृत्ती नकोय परत..."

"मला तर वाटलेलं की आई नोकरी करायच्या याचा अर्थ तू मला नाही रोखणार..."



"रोखलंही नसतं..पण विचार कर...तू आणि मी रोज बाहेर...यंत्रवत जीवन जगणार..घरात मुलांना वेळेवर सगळं कोण बघणार..मी म्हणत नाही तू दिवसभर घरकाम कर...पण घरात कोणीतरी घरातलं पूर्णवेळ असणं हे खूप मोठं समाधान देऊन जातं..."

"अरे आजकाल सगळेच तर करतात..."

"वाद नको...मी लहान असताना आई शाळेवर जायची...घराकडे पाहू वाटत नसे...अस्ताव्यस्त घर...वस्तू जागेवर सापडत नसायची..आईला कधी उशीर झाला तर आम्ही भूक भूक करत चिडचिड करायचो...बाबा आणि आम्हाला वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसे...आणि आईलाही किती कामं पुरायची... धावपळ व्हायची आईची...शाळेतून थकून आल्यावर बिचारी घर आवरे... तिचं थकणं आम्हाला बघू वाटायचं नाही..."

अनुराधा ला ते कुठेतरी पटलं..

"ठीक आहे...खरं आहे तुझं..मी नोकरी केली तर घराला घरपण राहणार नाही..."

"काय संबंध घर आणि नोकरीचा?"

मागून अचानक अनुराधा चे सासरे आले, त्यांनी सगळं बोलणं ऐकलं...

"गिरीश...चुकतोय तू...सुनबाई घराबाहेर पडतेय, नवं जग तिला समजेल...नवीन गोष्टी शिकेल... तिला अडवू नकोस..."

"पण बाबा...आई नोकरी करत असताना आपले झालेले हाल तुम्हाला आठवत नाहीये का? का पुन्हा ये रे माझ्या मागल्या?"

"चूक आईच्या नोकरीची नव्हती, ती आपली होती...आई नोकरी करते म्हणून आपण जरा तरी मदत करायचो का तिला? घरातल्या वस्तू आपण जागेवर ठेवत नव्हतो आणि चिडचिड मात्र तिच्यावर करायचो...चूक आईची नव्हती... चूक आपली होती..आपण स्वतःला शिस्त लावली नव्हती...घर आईनेच आवरावं...घरातलं एकेक काम फक्त तिनेच करावं... घर म्हणजे फक्त 'आई' अश्या समीकरणात आपण रहात होतो...आता बघ, अनुराधा जर नोकरीवर गेली तर आपणही स्वतःला शिस्त लावून घेऊ...प्रत्येकाने आपापली खोली साफ केली, आपापल्या खोलीला झाडू पोचा केला, जेवण झाल्यावर आपापलं ताट धुवून ठेवलं, मशीन मधले आपापले कपडे दोरीवर टाकले, आपापल्या वस्तू जागेवर ठेवल्या तर किती छान..एक तर आपल्याला चांगल्या सवयी लागतील.घरही स्वच्छ राहील आणि अनुराधाही बिनधास्तपणे नोकरी करू शकेल...बंटी ला स्वयंशिस्त लागेल...चार पदार्थ आपण शिकून घेऊ म्हणजे वेळ आली तर उपाशी राहणार नाही..."

"पटतंय बाबा..पण नोकरी करणं इतकं आवश्यक आहे का?"

"हो..आवश्यक आहे..तुझी आई नोकरी करत होती, जास्तीचे चार पैसे हातात पडत होते, त्याच जीवावर तुझं इंजिनिअरिंग करता आलं..तुझ्या आईला बाहेर पडल्यामुळे जगातल्या चार गोष्टी समजू लागल्या...त्याच तुम्हाला तिने शिकवल्या..म्हणूनच तुम्ही इतर मुलांपेक्षा स्मार्ट होतात..आईने तुमचा अभ्यासही घेतला आणि जगात कसं वावरावं याचे संस्कार दिले, म्हणून तुम्ही आज यश मिळवत आहात... मी जर तुझ्या आईला घरातच बसवून ठेवलं असतं तर...तू शिकलाही नसतास, आणि चार लोकांत बोलण्याची धिटाई तुझ्यात आलीही नसती..."

"बाबा...तुम्ही ग्रेट आहात...मी स्वतःला मॉडर्न म्हणवून घेत होतो पण तुमच्यासारखे आधुनिक विचार करण्याची माझी हिम्मत होत नव्हती..."

अनुराधा च्या डोळ्यात पाणी आलं..तिने चटकन सासऱ्यांचे पाय धरून आशीर्वाद घेतला..

आणि अशा प्रकारे सासरेबुवांनी दुसऱ्या एका रणरागिणीला उभं केलं...घर आणि नोकरी यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी.....

No comments:

Post a Comment